नव्या स्वरुपातील डिजिटल सातबाराचे घरोघरी वाटप
Free digital satbara for maharashtra farmer
Free digital satbara for maharashtra farmer |
महाराष्ट्र सरकारने सातबारा संगणकीकरणाचा कार्यक्रम हा 2008 मध्ये सुरू केला होता. जमिनीच्या संदर्भात असणाऱ्या 21 प्रकारचे वेगवेगळ्या नमुन्यामधील सातबारा हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे.
आजच्या डिजिटल युगात महसूल विभागानेही पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा हाती घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागाचे अनेक उपक्रम हे डिजिटल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कागदोपत्री असलेले सात-बारा व आठ ई हे उतारे महसूल विभागाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहेत.
हे सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सातबारा डिजिटल करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून एका क्लिकवर सातबारा उपलब्ध व्हावा हे आहे.
शेतकऱ्यांना सातबारा डिजिटल सात-बारा काढण्यासाठी आता तलाठी कार्यालयांमध्ये ये-जा करण्याची गरज नाही. कारण ऑनलाइन डिजिटल पद्धतीने तुम्ही तुमचा सातबारा तुमच्या मोबाईलवर किंवा संकेतस्थळावर जाऊन काढू शकता. आणि तो तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा वापरता येईल. यासंबंधी महसूल विभागाने एक शासन निर्णयसुद्धा जारी केलेला आहे. त्यामुळे आता सर्व पतसंस्था असतील सर्व शासकीय कार्यालये आणि बँकांचे कार्यालय यामध्ये डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा चालणार आहे. तसेच यापुढे सर्व शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा सेतू मार्फत प्रत्येकाला दिला जाणार आहे.
सात-बारा उताऱ्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पूर्वीपेक्षा सोप्या व सुटसुटीत पद्धतीत हा उतारा आता मिळणार आहे. यामध्ये क्यू आर कोड, राजमुद्रा असलेला हा नव्या स्वरूपातील हा बदलेला सात-बारा ऑनलाईन उपलब्ध असला तरी अद्याप सर्वच खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागात ऑनलाईन उतारा काढण्याची सोय उपलब्ध होईलच असे नाही. तसेच नव्या स्वरुपातील सात-बारा उतारा कसा आहे, हे शेतकऱ्यांनाही कळावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावोगावी शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप सुरू आहे. या उताऱ्यासोबत एक प्रतिसाद फॉर्म दिला जात आहे. यामध्ये आपल्या सात-बारा उताऱ्यात काही त्रुटी, दुरुस्ती असतील तर त्याची माहिती द्यायची आहे. त्यानुसार, नंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ही मोहिम सुरू केली आहे.
कोकण विभागात डिजिटल सात–बारा वाटप मोहिमेस गती
- ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 लाख 45 हजार 171 इतके सातबारे असून त्यापैकी 5 लाख 4 हजार 91 शेतीचे सातबारा आहेत. यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 1 लाख 25 हजार सात-बारा उताऱ्याचे वाटप जिल्ह्यात झाले आहे.
- पालघरमध्ये 4,96,118 इतके सातबारा आहेत.
- रत्नागिरीमध्ये 20 लाख 22 हजार 678 सातबारा डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत.
- रायगड जिल्ह्यात एकूण 11 लाख 52 हजार 621 सातबारा उतारे आहेत. त्यापैकी 9 लाख 89 हजार 663 उताऱ्यांचे वाटप करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे 90 हजार उताऱ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.