मेळघाटातील टेंभुर्णी ढाणा सौर ऊर्जेच्या ( solar power ) प्रकाशाने उजळले – ‘महाऊर्जा’कडून दिवाळीची प्रकाशभेट
शतकापासून अंधारात असलेल्या मेळघाटातील टेंभुर्णी ढाणा या गावात ‘मेडा’कडून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ मिळालेले हे आता पर्यंतचे मेळघाटातील तिसरे गाव आहे.
यापूर्वी धारणी तालुक्यातील चोपण आणि चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेड्या येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून तिथे घरोघर वीज पोहोचविण्यात आली आहे.
विविध कारणांमुळे ‘महावितरण’ची वीज पोहोचणे शक्य नसल्यामुळे मेळघाटातील दुर्गम खेड्यांपर्यंत वीज पोहोचणे हे मोठे आव्हान होते. या समस्येवर उपाययोजनेसाठी ‘महाऊर्जा’ने (मेडा meda ) सौर ऊर्जा निर्मितीसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा renewable energy पर्याय दिला आहे.
त्यानुसार चोपण व रेट्याखेड्यापाठोपाठ माखलानजिक टेंभुर्णी ढाणा या गावालाही सौर ऊर्जाधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे.
टेंभुर्णी ढाणा गावातील सूक्ष्म पारेषण सौर ऊर्जा प्रकल्प 37.8 किलोवॅटचा आहे. त्यासाठी 69 लाख 9 हजार रुपयांचा निधी खर्च झाला.
या प्रकल्पामुळे गावातील कुटुंबाना चोवीस तास वीज मिळू लागली असून गावांत 20 पथदिवेही कार्यान्वित झाल्याने रस्तेही उजळले आहेत.
जिल्हाधिकारी पवनीत कौर व धारणी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनीही आढावा घेऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार ‘महाऊर्जा’तर्फे दिवाळीपूर्वी प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित झाला असून तेथील रहिवाशांमध्ये दिवाळीची प्रकाशभेट मिळाल्याची भावना आहे.