शेतकरी परंपरेतला एक महत्वाचा मराठमोळा सन.
येळावस - वेळ आमावस्या
लातूर , उस्मानाबाद, नांदेडसह राज्याच्या सीमावर्ती भागात आज दि. 2 जानेवारी रोजी शेतकऱ्यांकडून एक सण साजरा केला जातो तो म्हणजे येळवस - वेळाअमावस्या.
कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा सण हिरवाईचा एक अपूर्व सोहळा.
नेमका हाच सण कसा साजरा केला जातो , काय आहेत परंपरा जाणून घेऊयात,
भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृती पासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा ,यमुना , गोदावरी , सरस्वती ,नर्मदा ,सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तीला लातूर जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन भक्ती भावाने केली जाते.
साधारणपणे एकादशी पासून वेळामावस्येच्या साधनाची जमवा-जमव सुरु होते. यामध्ये तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग सह सर्व रानमेवा जमा केला जातो.
वेळामावस्येच्या दिवशी पहाटे घराघरात चूल पेटते.
बेसनपिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी… म्हणजे भज्जी याच बरोबर चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल अंबील, मोठ्या मोठ्या भाकरी, गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर नेला जातो.
सकाळी पूजाकरुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते….. जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही,
१२ बलुतेदार ,आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने हा हे सगळे खावू घातले जाते. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे, आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करुन ती शमली की तीच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा मनमोहक सण आहे.
सर्व शेतकरी बांधवांना वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा !