शेतकऱ्यांना मिळणार १४ दिवसात किसान क्रेडिट कार्ड | Kisan Credit Card Scheme

शेतकऱ्यांना मिळणार १४ दिवसात किसान क्रेडिट कार्ड 

Kisan Credit Card Scheme


आज दिनांक 23 मार्च, 2022 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या सुधारणेसाठी आणि चांगल्या अंमलबजावणीसाठी समितीने विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. 



बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले. सध्या, पीकपालन, पशुसंवर्धन आणि इतर संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांना अल्पमुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी केसीसी कर्ज दिले जाते.




यामध्ये अल्प मुदतीच्या कृषी कर्जाची कमाल मर्यादा १ वर्षापर्यंत आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी साधारणत: ५ वर्षांपर्यंत असते. बँका त्यांच्या नियमावलीनुसार कार्यकाळ वाढवू शकतात. 

भारत सरकार केसीसीच्या माध्यमातून अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी व्याज सवलत योजना राबवित आहे, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज सवलतीच्या दरात 7 टक्के तर अतिरिक्त 3 टक्के प्रॉम्प्ट रिपेमेंट इन्सेन्टिव्ह (पीआरआय) प्रभावी व्याजदर 4 टक्के करते. 

समितीला संबोधित करताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की सरकार उर्वरित सर्व लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा ( PM KISAN ) लाभ मिळावा म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यासाठी मोहीम राबवत आहे. ते म्हणाले की, प्रक्रिया शुल्क, तपासणी शुल्क, खातेवही, फोलिओ शुल्क यासारख्या अल्पमुदतीच्या कर्जावरील 3 लाख रुपयांपर्यंतचे सर्व प्रशासकीय शुल्क माफ करण्यात आले आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेद्वारे स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल.

या बैठकीत किसान क्रेडिट कार्ड ( KCC )साठी अर्ज सुलभ करण्यात आला आहे आणि संपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून 14 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी यावेळी दिली. 

शेतकऱ्यांना सवलतीच्या कर्जाची उपलब्धता करण्याच्या दिशेने बँका आणि इतर हितधारकांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांच्या परिणामी, 4 मार्च 2022 पर्यंत सुमारे 2.94 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड ( KCC ) योजनेंतर्गत 3.22 लाख कोटी रुपयांच्या मंजूर पत मर्यादेत  लाभ देऊन मैलाचा टप्पा गाठला आहे असेही मंत्र्यांनी सांगितले.


समिती सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या व योजनेत आणखी सुधारणा करण्यास सुचवले. तोमर यांनी समिती सदस्यांचे त्यांच्या बहुमूल्य सूचनांबद्दल आभार मानले आणि त्यांना आश्वासन दिले की मंत्रालय प्रत्येक सूचनेकडे लक्ष देईल आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनुकूल उपाय काढेल. 

सदस्यांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील शेतकरी समुदायामध्ये किसान क्रेडिट कार्ड विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली.

या बैठकीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी, लोकसभा सदस्य श्री. बेलाना चंद्रसेकर, श्री. गुरजीतसिंग औजला, श्रीमती जसकौर मीना, श्री महेंद्रसिंह सोलंकी, श्री प्रदीपकुमार चौधरी, श्रीमती रमा देवी, श्री रॉडमल नगर व श्री श्रीनिवास दादासाहेब पाटील, राज्यसभा सदस्य श्रीमती गीता उर्फ चंद्रप्रभा आणि श्रीराम शाकल उपस्थित होते.