शेतकऱ्यांनो घाबरू नका; देशात खतांची उपलब्धता मागणीपेक्षा अधिक | Fertilizer for kharif

शेतकऱ्यांनो घाबरू नका; देशात खतांची उपलब्धता मागणीपेक्षा अधिक  

केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया

fertilizer for kharip



केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील खतांच्या स्थितीबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत आज एक महत्वपूर्ण संयुक्त आढावा बैठक घेतली.

या बैठकीत युरिया, डीएपी आणि एनपीके आणि इतर खतांचा पुरवठा पूर्वस्थितीत आणण्यासाठी सरकारने केलेल्या सक्रिय उपाययोजनांमुळे, सध्या देशात २०२२ खरीप हंगामासाठी मागणीपेक्षा जास्त खतांचा साठा आहे, यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे खात उपलब्ध होईल असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र तोमर यांनी व्यक्त केला याबरोबरच त्यांनी सर्व राज्यांना शेतकऱ्यांना खतांच्या उपलब्धतेबाबत पुरेशी आणि अचूक माहिती पुरवण्याचा आणि खतांच्या साठ्यांशी संबंधित भीतीचे वातावरण निर्माण न करण्याचा किंवा चुकीची माहिती न देण्याचा सल्ला दिला आणि असे कोणी करत असेल तर यावर नियंत्रण ठेवण्याचा साल देखील दिला. 

या बैठकीत साठेबाजी, काळाबाजार किंवा खते दुसरीकडे वापरणे यांसारख्या गैरप्रकारांचा सामना करण्याच्या गरजेवर भर देऊन केंद्रीय मंत्री म्हणाले की, अशा परिस्थितीत सरकार कठोर कारवाई करेल. खतांच्या बाजारपेठेतील अलीकडचा  कल  आणि पर्यायी खते आणि नॅनो युरियाचा वापर यासारख्या कृषी पद्धतींबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले.

केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांना आवश्यकतेनुसार  खतांच्या ने-आण प्रक्रियेचे काटेकोरपणे सूक्ष्म-नियोजन हाती घेण्याचे आणि रेल्वे वाहतुकीचा  चांगल्या प्रकारे  वापर करण्यासाठी रेकमधून साठा वेळेवर उतरवण्याचा सल्ला दिला. राज्यांना देखील विशेषत: सहकारी मार्गांद्वारे  खतांचा पुरेसा साठा करण्याचा सल्ला देण्यात आला.

या बैठकीचा समारोप करताना केंद्रीय रसायन आणि खते मंत्री म्हणाले की, महामारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असतानाही, आम्ही अनुदानात वाढ करून खतांच्या किमती अगदी कमी ठेवल्या आहेत, जेणेकरून आमच्या शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये.

याचबरोबर यावर्षी शेतकऱ्यांना सुमारे अडीच लाख कोटींचे अनुदान दिले जाणार आहे. खतांचा समतोल वापर व्हावा यासाठी आपण नियोजन केले  पाहिजे. प्रत्येक जिल्हा स्तरावर किती खते उपलब्ध आहेत आणि किती आवश्यक आहेत याची नोंद घ्यावी आणि गैरव्यवहार किंवा कोणताही अनुचित प्रकार  किंवा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने किती खते खरेदी केली आहेत यावर लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.