पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरूOnline Crop loan application jalna

पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Online Crop loan application jalna


शेतकऱ्यांना पीककर्ज सुलभतेने मिळण्यासाठी विकसित सॉफ्टवेअरचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ

शेतकऱ्यांना पीककर्ज सुलभतेने मिळावे यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून याचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज दि.13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आला.


यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आशुतोष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खरीप हंगाम 2022-23 साठी जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत पीककर्ज वाटप सुरू आहे. पीककर्ज वाटपासाठी गर्दीचे नियमन होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून गुगल लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरून पीककर्ज मागणी नोंदविण्यात येत होती. 

या लिंकवर 10 जून, 2022 पर्यंत 15 हजार 42 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून याद्या जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकामार्फत संबंधित बँक शाखांकडे पाठविण्यात आल्या आहेत. jalna.cropsloan.com या नावाने नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून  गुगल लिंकद्वारे  पीककर्ज नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. 

या सॉफ्टवेअरची लिंक jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून या लिंकद्वारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सॉफ्टवेअरमधून थेट संबंधित बँकेकडे कार्यवाहीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती श्री चव्हाण यांनी पालकमंत्री महोदयांना यावेळी दिली. 

तसेच सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेत आवश्यक कागदपत्रांसह भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.