कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस | havaman Andaj

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj


कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दि. 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर दि. 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा सागरी किनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर आज दि. 4 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.