१ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस’
Maharain Maharashtra 2024
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नोंदीनुसार, दि. १ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली या एकमेव जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत ३१% कमी पाऊस झाला आहे.२५ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ७९% आणि ७२% इतका जास्त पाऊस झाला असून, हे दोन जिल्हे सामान्य सरासरी पर्जन्यमानापेक्षा सर्वात जास्त विचलन असलेले जिल्हे आहेत.
इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २०% ते ५९% जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये ५९% जास्त अतिवृष्टीसह लातूर जिल्ह्याचा समावेश आहे, ५५% जास्त अतिवृष्टीसह पुणे जिल्ह्याचा समावेश आहे, ५०% जास्त अतिवृष्टीसह जळगाव, ४८% जास्त अतिवृष्टीसह नाशिक आणि बीड, ४७% जास्त अतिवृष्टीसह धुळे, ४६% जास्त अतिवृष्टीसह कोल्हापूर, ४५% जास्त अतिवृष्टीसह परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस झाला आहे.
महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध
कृषी विभागामार्फत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या असून पर्जन्यमानाचा महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक आकडेवारी अहवाल https://maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट पासून प्रकाशित करण्यात येत आहे.
https://maharain.maharashtra.gov.in/test/maharain/
कृषी व पदुम विभागाच्या ८ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये ‘महावेध’ प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी भागीदारीतुन ‘बांधा-मालक व्हा- चालवा’ (बीओओ) तत्वावर अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सेवा पुरवठादार संस्था म्हणुन नियुक्ती केली आहे. प्रकल्पातंर्गत राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
पर्जन्यमानाची आकडेवारीसाठी महारेन व महावेध या दोन स्वंतत्र प्रणाली कार्यान्वित ठेवण्याऐवजी महावेध प्रणालीमधील पर्जन्यविषयक आकडेवारी महारेन संकेत स्थळावर प्रकाशित केली जाते.
महावेध प्रकल्पातील पर्जन्यमानाची आकडेवारी दररोज एपीआय लिंकद्वारे महारेन संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येते. महावेध या प्रणालीमध्ये एक वर्षापूर्वीची हवामानविषयक आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर महारेन या सार्वजनिक संकेतस्थळावर दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात येते.
महारेन प्रणालीच्या अत्यावश्यक तांत्रिक बदलासाठी ६ जुलै २०२२ पासून हे संकेतस्थळ देखभालीसाठी ठेवण्यात आले होते. तथापि, या कालावधीतही शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दैंनदिन पर्जन्यमानाची आकडेवारी थेट महावेध संकेतस्थळाच्या एक्स्टर्नल लिंकद्वारे महारेन संकेतस्थळावर प्रकाशित करून सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आता महारेनचे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या सुधारण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या हवामानविषयक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक विकास पाटील यांनी दिली आहे.