बुलढाणा जिल्ह्यातील थकीत पीक विम्यासंदर्भातील अहवालाची फेरतपासणी होणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
pikvima 2022
बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर जवळपास तीन लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले होते, मात्र पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत न कळवल्याने किंवा अन्य कारणांनी 11 हजार शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही किंवा अत्यंत त्रोटक विमा रक्कम मिळाली. याबाबत संपूर्ण नुकसानाच्या अहवालाची फेरतपासणी करण्यात येईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य श्वेता महाले यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, राज्यात यावर्षी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची सुविधा राज्य शासनाने निर्माण केली असून याद्वारे आजपर्यंत 1 कोटी 14 लाख शेतकऱ्यांनी आपला विमा भरला आहे.
शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा आपत्कालीन काळात शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत त्यांची ऑनलाईन तक्रार करणे बऱ्याचदा शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला ऑनलाईन तक्रार करण्याचा अवधी 72 तासांवरून वाढवून किमान 92 तास इतका देण्यात यावा, याबाबत आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.