या जिल्ह्यांचा 2024 चा सोयाबीन विमा मंजूर, आगाऊ 25% वितरित होणार
kharip pik vima 2024
यवतमाळ जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीपोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास सूचना दिल्या होत्या. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून नुकसानग्रस्तांना पीक विम्याच्या २५ टक्के रक्कम येत्या महिनाभरात देण्याचे आदेश रिलायंस जनरल इंन्शुरन्स कंपनीला दिले आहे.
https://youtu.be/aqIu16uEaNk
सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. संयुक्त पाहणी अहवालानुसार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ११० महसूल मंडळामध्ये सोयाबीनचे उत्पादन हे मागील सात वर्षांच्या सरासरीच्या ५० टक्के कमी होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. याची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याबाबत विमा कंपनीस निर्देश देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या.
सर्वेक्षण अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अधिसूचित मंडळातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीला दि.३० सप्टेंबर रोजी आदेश दिले. त्यानुसार अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. ही अधिसूचना जाहीर केल्यापासून पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीस देण्यात आले आहेत.
पीक विमा रकमेच्या २५ टक्के रक्कम अदा केल्यानंतर हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी पात्र राहतील. नुकसानभरपाईपोटी देण्यात आलेली आगाऊ २५ टक्के रक्कम अंतिम येणाऱ्या नुकसानभरपाईतून समायोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.